पंढरपूर – तालुक्यातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेची बुधवारी (ता.१७) तिसऱ्या दिवशी उत्साहात सांगता झाली. तत्पूर्वी बुधवारी सकाळी यल्लामा देवीच्या मुर्तीची मंदिरा पासून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. परंपरे प्रमाणे सकाळी मंदिरा पासून सुरु झालेल्या पालखी मिरवणूकीने दिवसभरातील सर्व रितीरिवाज तसेच मानपान पुर्ण करुन सायंकाळी अग्निहोमाच्या (किच ) विधीने यात्रेची सांगता करण्यात आली.
दरम्यान यात्रेतील दुसऱ्या दिवशी अर्थात नैवेद्याच्या दिवशी मंगळवारी रात्री बारा वाजता खंदारे कुटुंब यांच्याकडून विजापूर येथून देवीसाठी फुले व पुजासाहित्य आणले गेले. ते साहित्य देवीच्या मंदिरात देवीच्या पूजेसाठी नेण्यात आले. त्यावेळी सर्व मानकऱ्यांच्या हस्ते यल्लामा देवीची विधीवत पुजा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.
त्या नंतर बुधवारी (ता.१७) तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता देवीची पालखी मंदिरातून बाहेर आणण्यात आली. ती पालखी यल्लामा मंदिराच्या थोड्याअंतरावर बाजूलाच असलेल्या श्री महामाया देवीच्या मंदिरात देवीच्या भेटीसाठी नेण्यात आली. त्या ठिकाणी देवीची भेट घेऊन गावातील दोन देशमुख परिवार आणि देशपांडे परिवार अशा तिन्ही मानकऱ्यांच्या माहेरघरी नेण्याची प्रथा आहे. त्या प्रमाणे सुरुवातीला वसंतराव देशमुख यांच्या वाड्यात येऊन पालखी विसावली. त्या ठिकाणी वसंतराव देशमुख परिवाराला देवीची खणा नारळाने ओटीचा मान असतो. त्या प्रमाणे सर्व सोपस्कर पार पडले. त्या नंतर पालखी भाऊसाहेब देशमुख यांच्या वाड्यात आली. त्या ठिकाणी भाऊसाहेब देशमुख परिवाराकडून देखील मान घेऊन नंतर पुन्हा ती गावातील मानकरी असलेले अरविंद माधव देशपांडे यांच्या वाड्यात पोहचली. त्या ठिकाणी देशपांडे परिवाराकडून मान घेऊन गावातील सर्व समाजातील मानपान घेऊन पालखीने गाव प्रदक्षिणा पूर्ण केली. गावप्रदक्षिणा पुर्ण झाल्यानंतर पालखी पुन्हा यल्लामा मंदिराजवळ आणण्यात आली. त्या ठिकाणी पालखी थोडावेळ विसावते.
————————
अग्निहोम ( किच ) विधी संपन्न
पालखी गावप्रदक्षिणा पुर्ण करुन पुन्हा यल्लमा मंदिरात विसावल्या नंतर पालखी व सर्व जग-जोगती यांची मानकरांच्या हस्ते खणा नारळाने ओटी भरण्यात आली. तसेच पालखी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी व जग-जोगती मंदिराच्या जवळ असलेल्या अग्निहोमाकडे आले. त्यावेळी तेथे अग्निहोमाची पूजा करून पालखी अग्निहोमामध्ये प्रवेश करते. पालखीने प्रवेश केल्यानंतर सर्व जग-जोगती अग्निहोमाला प्रदक्षिणा घालून पालखीसोबत मंदिराकडे येतात. या अग्निहोम (किच ) विधीनंतर यात्रेची परंपरे प्रमाणे सांगता झाली.


























