अफगाणिस्तानमध्ये आज, बुधवारी पुन्हा एकदा भूकंचे जोरदार धक्के जाणवलेत. वायव्य अफगाणिस्तानात हे धक्के बसले असून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.3 नोंदवल्याचे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सने (जीएफझेड) सांगितले.
याबाबत जीएफझेडने दिलेल्या माहितीनुसार वायव्य अफगाणिस्तानातील हे भूकंपाचे धक्के जमिनीखाली 10 किमी (6.21 मैल) जाणवले. यापूर्वी शनिवारी झालेल्या भूकंपामुळे अफगाणिस्तानात मोठी हानी झाली होती. सलग 6 भूकंपाचे धक्के बसल्याने 4 हजार नागरिक ठार झाले होते. या धक्क्यातून सावरत असतांना आज पुन्हा भूकंप झाला. दरम्यान आज, बुधवारी झालेल्या भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचे कोणतेही वृत्त नाही. तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपानंतर अफगाणिस्तानात झालेल्या हा सर्वाधिक शक्तिशाली भूकंप मानला जातो. तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या भूकंपात त्यावेळी 50 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.