उत्तरप्रदेशातील अयोध्या नगरीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित दीपोत्सवाची जय्यत तयारी झालीय. शरयू नदीवरील 51 घाट सुसज्ज झाले असून याठिकाणी शनिवारी 24 लाख दिवे उजळणार आहेत. या आयोजनातून नवा वर्ल्ड रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार अयोध्येत दीपोत्सवाची सर्व तयारी सुरू आहे. दीपोत्सवात 25 हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या स्वयंसेवकांनी
गुरुवारी संध्याकाळपर्यंत शरयू नदीच्या 51 घाटांवर दिवे सज्ज ठेवले आहेत. त्यासोबतच लेझर शोचीही तयारी सुरू आहे. लेझर शोच्या माध्यमातून प्रभू श्रीराम चरित्राची झलक दाखवण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे. आगामी 11 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या दीपोत्सवात भारत कुंड, गुप्तार घाट, बिर्ला धर्मशाळा, रामघाट, रामकथा पार्कमध्ये भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
यंदा दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या काठावरील लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शरयू नदीच्या काठावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा दीपोत्सव अनेकार्थांनी खास ठरणार असल्याचे बोलले जात आहे. केवळ जागतिक विक्रमच नाही तर अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. दीपोत्सवात परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यात रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील 21 राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे 2500 कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.