दिल्लीतील जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरला अयोध्येताली राम मंदिरातील श्रीरामांच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट दान करायचा आहे. त्यासाठी त्याने मंदिराच्या ट्रस्टींना पत्र लिहिलं आहे.
फसवणुकीच्या आरोपाखाली दिल्लीतील मंडोलीच्या तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अयोध्या मंदिरातील श्रीरामांच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट दान करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी त्याने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रमुखांना दोन पानी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने भगवान श्रीरामांच्या मूर्तीसाठी मुकुट दान करायचा असल्याचं लिहिलं आहे.
सुकेश चंद्रशेखरने त्याच्या वकीलांमार्फत राम मंदिर ट्रस्टला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने लिहिलंय, की त्याला जो मुकुट दान करायचा आहे, त्या मुकुटाचं वजन ११ किलो असून तो ९१६.२४ कॅरेट सोन्याचा आहे. त्याशिवाय मुकुटात १०१ हिरे आहेत. प्रत्येक हिऱ्याचं वजन ५ कॅरेट आहे. मुकुटाच्या मध्यभागी एक पाचू हिरा असून तो ५० कॅरेटचा आहे. श्रीरामांच्या मूर्तीसाठी हा मुकुट दक्षिण भारतातील एका प्रसिद्ध कारागिराने तयार केला आहे.
पत्रात सुकेश चंद्रशेखरने असंही लिहिलंय, की त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची प्रभू श्री रामांप्रती असलेल्या भक्तीमुळे त्यांना ही भव्य भेट देण्याची प्रेरणा मिळाली आहे. मुकुट दान करणं हे त्यांच्यासाठी एक स्वप्न असून हा आशीर्वाद असल्याचं ते मानतात. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट श्रीरामाच्या आशीर्वादाचा परिणाम असल्याचं त्याने लिहिलं आहे.
सुकेश चंद्रशेखरने त्याच्या स्टाफला आणि त्याचे कायदेशीर सल्लागार अनंत मलिक यांना अधिकृत केलं आहे, जे ट्रस्टला मुकुट भेट देतील. मुकुटासंबंधी बिलं, पावत्या आणि इतर सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याची ते खात्री करतील. श्रीरामांसाठी तयार करण्यात आलेला सोन्याचा मुकुट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा २२ जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी मंदिराचं उद्घाटन करतील अशी शक्यता आहे. राम मंदिर उद्घाटनासाठी दोन महिने बाकी आहेत. उद्घाटनाच्या दिवशी जवळपास दीड लाख लोक राम मंदिराला भेट देतील अशी अपेक्षा असल्याचं, मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं.