अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील पाच लोकांच्या रहस्यमयरीत्या झालेल्या मृत्यूचे गूढ शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या पाचही जणांचा मृत्यू अन्नातून व पाण्यातून दिलेल्या विषबाधेतून झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात मृतांच्या महिला नातेवाईकांना १७ ऑक्टोबरला रात्री अटक केली. न्यायालयाने दोन्ही महिला आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकाच कुटुंबातील पाच लोक रहस्यमयरीत्या मृत पावल्यामुळे अहेरी परिसरात खळबळ उडाली होती. या पाचही लोकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. हे डॉक्टरांनाही कळू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढत गेले. यात जादूटोण्याचा संशय लोकांनी व्यक्त केला. एकाच कुटुंबातील पाचही लोकांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते. अखेर मागील तीन दिवसांत पोलिसांनी या पाचही जणांच्या मृत्यूचे रहस्य शोधून काढले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी महागाव येथील शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार करूनही डॉक्टरांना त्यांचे जीव वाचविता आले नाही. २६ सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व २७ सप्टेंबर रोजी विजया कुंभारे यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच कुंभारे यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे, सोबतच शंकर कुंभारे यांची साळी वर्षा उराडे यांची अचानक प्रकृती बिघडली. या तिघांनाही वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले व त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाला. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही. ८ ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, १४ ऑक्टोबर रोजी वर्षा अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उराडे व १५ ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाचही लोकांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे कळायला मार्ग नव्हता.
आई-वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर दिल्लीहून चंद्रपूर येथे आला होता. आई-वडिलांच्या अन्त्यसंस्कारानंतर तो दिल्ली येथे परत गेला. तेव्हा अचानक त्याचीही प्रकृती बिघडली. याशिवाय शंकर कुंभारे व त्यांच्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यासाठी गेलेल्या कारचालक राकेश मडावीचीही प्रकृती अचानक बिघडली. या प्रकरणात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी तपासचक्रे फिरवून आरोपींना शोधून काढले. पाचही जणांच्या मृत्यूचे कारण जवळपास सारखेच असल्याने व मरण पावल्यानंतर दिसून आलेली लक्षणेसुद्धा मिळतीजुळती असल्याने पोलिसांनी शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे व त्यांच्या साळ्याची पत्नी रोझा रामटेके यांच्यावर संशय असल्याने पाळत ठेवली. त्यात पोलिसांना यश आले.
या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके या दोघींनाही १७ ऑक्टोबरला अटक केली. त्यांनी परराज्यातून विष आणले होते. या पारदर्शी विषाला रंग नाही, चव नाही. असे ते विष अन्नातून व पाण्यातून मृतांना दिल्याचे निष्पन्न झाले. या मृतांसोबत असणाऱ्या नातेवाईकांना व कारचालकाला संघमित्रा व रोझा यांनी जडीबुटी असलेले पाणी असल्याचे सांगून विष घातलेले पाणी प्यायला दिले होते. त्यामुळे त्यांचीही प्रकृती बिघडली. ते आता रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अजूनही काही आरोपी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.