आसाममधील मदरशात शिकणाऱ्या बालकाच्या हत्येप्रकरणी एका ईमामाला पोलिसांनी अटक केलीय. मुकिल रहमान खान असे आरोपी ईमामाचे नाव आहे. त्याने सुडाच्या भावनेतून या बालकाची हत्या केल्याची माहिती चौकशीत पुढे आलीय. त्यामुळे मदरशातील व्यवस्था आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसामच्या काचाल ढोलाई परिसरात दारूस सलाम हाफिजिया नामक मदरसा आहे. या मदरशात शिकणाऱ्या एका 12 वर्षीय विद्यार्थ्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह 13 ऑगस्ट रोजी आढळून आला होता. मृत विद्यार्थ्याने 4 महिन्यांपूर्वी मदरशात प्रवेश घेतला होता. त्याचा मोठा भाऊही तिथेच राहत होता. मुलाचे वडील शेतकरी असून आसाम-मिझोराम सीमेजवळील फ्रेंच नगर गावात राहतात. मृतक विद्यार्थी वसतिगृहाच्या खोलीत 6 मुलांसह राहत होता. रविवारी सकाळी मुले नमाजसाठी उठली असता त्यांना तो बेडवर दिसला नाही. अशा स्थितीत त्याचा शोध घेतला असता पलंगाखाली त्याचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता . त्यानंतर मुलांनी व्यवस्थापनाला घटनेची माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. तसेच वसतिगृह सील केले होते.
पोलिसांनी आरोपी इमाम आणि वॉर्डनला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान इमामवर संशय आला, त्याआधारे त्याला अटक करण्यात आली. मुकिल रहमान खान नावाच्या इमामने काही दिवसांपूर्वी मुलाला बेदम मारहाण केली होती. तो त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. मुलाने याबाबत व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, त्यानंतर त्याला व्यवस्थापनाची माफी मागावी लागली होती. त्याचा राग त्या मुलावर काढून त्याची हत्या केल्याचे कबुल केलेय.