जूनमध्ये पावसाळा सुरु झाला, तरीपण ३१ जुलैपर्यंत उजनी धरण उणेच होते. १ ऑगस्टपासून धरण प्लसमध्ये आले आणि थोडे थोडे करीत ऑगस्टअखेरीस धरणातील पाणीसाठा १६ टक्क्यांवर पोचला. आता धरणात ३८ हजार क्युसेकचा विसर्ग येत असून उजनीची वाटचाल ५० टक्क्यांकडे सुरु आहे. मंगळवारी धरण निम्मे (५० टक्के) भरण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्यात विशेषत: धरण परिसरात मागील सहा-सात दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याने उजनीत येणारा विसर्ग वाढला आहे. आता उजनी धरणात घोड, कासारसाई, आंद्रा, चासकमान, भामाआसखेड, मुळशी, पवना या धरणातून जवळपास २२ हजार क्युसेक तर पाावसामुळे १६ हजार क्युसेकचा विसर्ग येत आहे. अवघ्या सातच दिवसात धरणात १० टीएमसी पाणी आले आहे.