पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांनी बुधवारी यश मिळाले. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला चेन्नईतून अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून ललित पाटील पोलिसांना गुंगार देत होता. पुणे पोलीस दलाची जवळपास १० पथके त्याच्या मागावर होती. तरीही ललित पाटीलचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर एका क्षुल्लक चुकीमुळे ललित पाटील हा पोलिसांच्या सापळ्यात सापडला.
पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील इतक्या दिवसांमध्ये कुठे-कुठे फिरला होता, याचा तपशील आता समोर आला आहे. पुण्यातून पळ काढल्यानंतर ललित पाटील हा काही दिवस नाशिकमध्येच वास्तव्याला होता. या काळात ललित पाटील याने बँकेतील आपल्या मुदत ठेव (Fixed Deposite) योजनेतील पैसे काढून घेतले होते. यानंतर त्याने तब्बल १ किलो सोने खरेदी केले. या काळात नाशिकमध्ये तो कुणाकडे राहत होता? त्याला कोणी आश्रय दिला होता, हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
काही दिवस नाशिकमध्ये थांबल्यानंतर ललित पाटील हा इंदौरला गेला. इंदौरवरुन तो सुरतला गेला होता. याठिकाणी त्याने एक टुर्स आणि ट्रॅवल्स गाडी भाड्याने घेतली होती. मात्र, काही दिवसांमध्येच तो नाशिकला परतला. या काळात पोलिसांची पथके त्याचा कसून शोध घेत होती. तरीही त्याने पुन्हा नाशिकमध्ये येण्याचा धोका पत्कारला. मात्र, तो कोणाच्या हाती लागला नव्हता. यावरुन ललित पाटील याला आपण पकडले जाणार नाही किंवा तशी वेळ आल्यास आपली ओळख वापरुन सहीसलामत सुटू, असा आत्मविश्वास असावा.
नाशिकमधून ललित पाटील धुळे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत कर्नाटकमध्ये पोहोचला होता. येथून तो पुढे चेन्नईला गेला. यादरम्यान ललित पाटील याच्या एका निकटवर्तीयाला पोलिसांनी अटक केली होती. ही व्यक्ती पोलिसांच्या अटकेत असताना त्याला ललित पाटीलचा फोन आला. तेव्हा पोलिसांनी सावध पवित्रा घेत संबंधित व्यक्तीला पोलिसांशी बोलायला सांगितले. ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे. त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती. त्याने ललितकडून तो कशाप्रकारे पळाला, कुठे -कुठे प्रवास केला याची माहिती घेतली. याआधारे पोलिसांनी ललितला चेन्नईतून ताब्यात घेतले.