दारु तयार करणाऱ्या कंपनीनं कारखान्यात काम करणाऱ्या २५० जणांना कामावरुन काढलं. त्यानंतर त्यांनी सहाव्या मजल्यावर चढून आंदोलन सुरू केलं. उत्पादन बंद झाल्यानं आणि कामावरुन काढण्यात आल्यानं नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास एक-एक करुन उड्या मारुन जीव देऊ, असा इशारा त्यांनी दिला. याची माहिती प्रशासनात खळबळ उडाली. जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
शाहजहापूरमधील युनायटेड स्पिरिट लिमिटेड दारु कारखान्याच्या व्यवस्थापनानं उत्पादन बंद केलं आहे. त्यासोबतच अडीचशे कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं. याबद्दलची नोटिस मिळताच कर्मचारी संतापले. कारखान्याच्या सहाव्या मजल्यावर चढून त्यांनी आंदोलन सुरू केलं. गेल्या २७५ दिवसांपासून कर्मचाऱ्याचं धरणं आंदोलन सुरू होतं. उत्पादन सुरू करण्याची त्यांची मागणी होती. पण कारखाना व्यवस्थापनानं त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे कर्मचारी कारखान्याच्या सहाव्या मजल्यावर चढले.
गेल्या अनेक वर्षांपासून ब्रँडेड कंपनीच्या दारुचं उत्पादन करणारे कर्मचारी अचानक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामावरुन काढण्याची नोटिस मागे घ्या आणि उत्पादन सुरू करा, अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास एक-एक करुन उडी मारुन जीव देऊ आणि याला जिल्हा प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन जबाबदार असेल, अशा इशारा कामगारांनी दिला.
कर्मचाऱ्यांना खाली येण्याचं आवाहन करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. कारखाना व्यवस्थानासोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली. ‘युनायटेड स्पिरीट लिमिटेडच्या दारु कारखान्याच्या व्यवस्थापनानं उत्पादन बंद केलं आहे. त्यांनी अडीचशे कर्मचाऱ्यांना काढलं आहे. याबद्दलच्या नोटिसा कर्मचाऱ्यांना आज मिळाल्या. त्यानंतर सगळे कर्मचारी कारखान्याच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले आणि आंदोलन करु लागले,’ असं कर्मचारी अरुण कुमार दीक्षित यांनी सांगितलं.