कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लाईम लाईट हा चित्रप ट (कथा, पटकथा, प्रमुख भूमिका, संगीत दिग्दर्शक, निर्माता आणि दिग्दर्शन… सबकुछ चार्ली चॅप्लिन) १९५२ – कुसुमाग्रज स्मारकात, सोमवार दिनांक ३० ऑक्टोंबर २३ रोजी संध्याकाळी सहा वाजता दाखविण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबर १९५२ रोजी, “लाईमलाईट” चित्रपट न्यूयॉर्क शहरात प्रदर्शित झाला होता.
हा चित्रपट चार्लीच्या एका दीर्घकथेवर आधारीत आहे. एका उध्वस्त विनोदवीराची ही गोष्ट ज्यात तो एका नर्तिकेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतो. मुख्य भूमिका चार्लीने स्वतःच केली. नर्तिकेच्या भूमिकेसाठी क्लेअर ब्लूम या नाटकातील अभिनेत्रीची निवड केली. चित्रपटाची कथा जरी लंडन शहरात घडत असली तरी याचे संपूर्ण चित्रीकरण हॉलिवूडमध्येच झाले. १३७ मिनिट लांबी असलेला हा चित्रपट बनवण्यास १९५२ मध्ये ९ लाख डॉलर्स इतका खर्च आला. विशेष म्हणजे या चित्रपटात चार्ली नेहमीप्रमाणे न दिसता त्याच्या ओरिजीनल लूक मध्ये होता. चित्रपट आपटला. १९७३ च्या ऑस्कर पुरस्कारात चार्लीला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. हा चार्लीचा एकमेव ऑस्कर पुरस्कार होय.
प्रादेशिक आणि जागतिक चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि प्रेक्षक सुजाण व्हावा हे फिल्म सोसायटीचे उद्दीष्ट असते. चित्रपट रसिकांनी अभिरुची संपन्न व्हावी यासाठी हे प्रयत्न. विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास सर्कल जवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार्या या चित्रपटास सर्वांना मुक्त प्रवेश आहे. या चित्रपटाची सब टायटलस मराठीत आहे. जास्तीत जास्त रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.