जागतिक आरोग्य संघटनेने या आजारांच्या वाढीबद्दल तपशीलवार माहिती चीनकडे मागितली असून, हे आजार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
करोनाचे उगमस्थान चीनमध्ये आता पुन्हा करोनाबरोबरच इन्फ्लुएंझा, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस(आरएसव्ही) एच९एन२, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, ऑडिनो अशा श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्याने चीनमधील रुग्णालयांमध्ये करोनासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या निमित्ताने सर्वांना करोनाची आठवण झाल्याने सर्व देशांनी चिंता व्यक्त केली आहे; तसेच जागतिक आरोग्य संघटनेने या आजारांच्या वाढीबद्दल तपशीलवार माहिती चीनकडे मागितली असून, हे आजार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
एच९एन२ हा एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणूचा एक प्रकार प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये आढळून येतो. त्यामुळे याला ‘बर्ड फ्लू’ असेही म्हटले जाते. माणसांमधून माणसांना संसर्ग होण्याचे याचे प्रमाण अत्यंत कमी आहे; तसेच या विषाणूमुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी असल्याने मृत्यूचा धोकाही कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्राण्यांना या विषाणूवर लस दिली जाते. भारतामध्ये इन्फ्लुएंझा विषाणूचे उपप्रकार असलेल्या एच१एन१ आणि एच३एन२, एच२एन२ या विषाणूचे रुग्ण आढळून येतात. भारतात या विषाणूंची लस दिली जाते. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी, खोकला, फुफ्फुसांना सूज येणे या प्रकारची लक्षणे सध्या चीनमधील रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. ही सर्व लक्षणे करोना, स्वाइन फ्लू या विषाणूसारखीच असल्याचे दिसून येत आहे.
चीनमध्ये का वाढले संसर्गजन्य आजार?
करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी राबविलेल्या ‘झिरो कोव्हिड’ धोरणामुळे काही प्रमाणात संसर्गजन्य आजार कमी झाले. मात्र, या धोरणामुळे चीनमधील नागरिकांना बराच काळ लॉकडाउनमध्ये राहावे लागल्याने नागरिकांचा एकामेकांशी संपर्क आला नाही. परिणामी अनेकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तया होऊ शकली नाही; तसेच या कालावधीत नागरिकांना कोणताही संसर्ग न झाल्याने शरीराला त्याची सवय झाली. आता नागरिकांचा एकामेकांशी संपर्क येत असल्याने चीनमध्ये संसर्गजन्य आजारांत वाढ होत आहे; तसेच थंडीच्या दिवसांमध्ये विषाणूचा प्रसार होण्यासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळेही विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये सध्या एच९एन२ या विषाणूबरोबरच करोना, इन्फ्लुएन्झा विषाणूचा उपप्रकार असलेला एच१एन१ आणि रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस(आरएसव्ही) न्यूमोनिया या विषाणूंचा प्रादुर्भाव होत आहे.
-भारताला धोका आहे का?
चीनमध्ये ‘एच९एन२ आणि श्वसनविकारांचा उद्रेक होत असल्याने करोनासारखाच या आजारांचा प्रसार सर्व देशांमध्ये होईल का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या आजारांचा भारताला धोका नाही. या प्रकारचा कोणताही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. भारत सध्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. विशेषतः कोरोनानंतर देशाने आरोग्य विषयक पायाभूत सुविधा सज्ज केलेल्या आहेत. त्यामुळे चीनमध्ये वाढत असलेल्या आजारांचा भारताला धोका कमी असल्याचे केंद्राच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. परंतु सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून राज्यांना सूचनाही देण्यात येत आहेत.
-कोणत्या वयोगटासाठी घातक?
इन्फ्लुएंझा विषाणूचा संसर्ग कोणत्याही वयोगटातील नागरिकांना होऊ शकतो. मात्र, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांमध्ये (को मॉर्बिड) गंभीर लक्षणे दिसून येण्याची शक्यता असते. चीनमध्ये सध्या लहान मुलांना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. मात्र लहान मुले का आजारी पडत आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या एच९एन२ विषाणूचे रुग्ण चीनच्या उत्तर भागात आढळून येत आहेत. तसेच यामुळे मृत्यूची नोंद अद्याप झाली नसल्याचे चीनने सांगितले आहे. त्यामुळे हा विषाणू किती घातक आहे आणि एका रुग्णापासून किती जणांना संसर्ग होऊ शकतो, यावर उपचार कोणते, कोणती लस द्यावी, या बाबत अभ्यास सुरू असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या विषाणूची लागण एका माणसांमधून दुसऱ्या माणसांमध्ये झाल्याचे फारसे प्रकार दिसून आलेले नाहीत, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.