पुणे : विराट कोहलीने बांगलादेशच्या सामन्यात आपले ४८ वे शतक झळकावले. या सामन्यात कोहलीने भारताला एकहाती सामना जिंकवून दिला. पण हा सामना संपला आणि त्यानंतर कोहलीने रवींद्र जडेजाची जाहीर माफी मागितल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहली जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा भारताच्या ८८ धावा झाल्या होत्या. त्यामुळे भारताला विजयासाठी २०० पेक्षा कमी धावा हव्या होत्या. पण त्यानंतर विराट कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि ४८ वे शतक साजरे केले. शतक झाल्यावर कोहलीने काही वेळ सेलिब्रेशन नक्कीच केले. पण त्यानंतर काही वेळातच कोहलीने जडेजाची माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. सामना झाल्यावर कोहलीची लगेच एक छोटेखानी मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी कोहलीने सर्वांसमोर जडेजाची माफी मागितल्याचे पाहायला मिळाले.
भारताला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. त्यावेळी कोहलीने षटकार खेचला आणि आपले शतक साजरे केले. कोहलीच्या यावेळी नाबाद १०३ धावा झाल्या. कोहलीचे शतक हे अखेरच्या चेंडूवर झाले. कोहलीने शतकानंतर आनंद साजरा केला. रोहित शर्माही मैदानात आला आणि त्याने कोहलीचे अभिनंदन केले. पण त्यानंतर कोहलीने जडेजाची माफी मागितली. कारण या सामन्यानंतर जेव्हा कोहलीची मुलाखत घेण्यात आली तेव्हा कोहली म्हणाला की, ” सर्व प्रथम मी रवींद्र जडेजाची माफी मागतो. कारण मला भारताच्या विजयात मोठे योगदान द्यायचे होते. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये मी भारताच्या विजयात अर्धशतक झळकावले आहे. पण यावेळी मी भारताच्या विजयात शतक झळकावू शकलो. जडेजाने या सामन्यात अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्याने मोलाच्या विकेट्सही मिळवल्या. जडेजा तेवढ्यावर थांबला नाही तर त्याने अफलातून कॅचही पकडली. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीर हा पुरस्कार मिळू शकला असता. पण शतकानंतर मी त्याच्याकडून सामनावीर हा पुरस्कार हिरावून घेतला आहे. त्यामुळे मी त्याची माफी मागतो.”
या सामन्यात १० षटकांत फक्त ३८ धावा दिल्या आणि दोन मोठे विकेट्स मिळवले. त्याचबरोबर जडेजाने यावेळी मुशफिकर रहीमचा अप्रतिम झेलही पकडला होता. त्यामुळे कोहलीचे शतक झाले नसते तर जडेजाला सामनावीर हा पुरस्कार मिळाला असता.