शिवसेना शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री शेवाळे (७३) यांचे रविवारी (१९ नोव्हेंबर) सायंकाळी आठ वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी तीन मुले, वर्षा अविनाश शेवाळे, माजी नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे या तीन सूना आणि सहा नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवाळे यांच्या मातोश्रींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
आज (सोमवारी) दुपारी त्यांच्या पार्थिवावर ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकृती बिघडल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचारांनंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज दिला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र, रविवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्यानंतर तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.