पॉज संस्थेचे कार्यकर्ते वर्षाचे 365 दिवस अहोरात्र पशु-पक्ष्यांची काळजी घेण्यात मग्न असतात. गेल्या 23 वर्षात पॉज संस्थेने आतापर्यंत 1132 साप, 2485 पक्षी, 13 माकडे, 3 कोल्हे, 65 कासवे, 31 विविध सरपटणारे प्राणी ज्यात घोरपड, पाली, रंग बदलणारे सरडे, 27 खारी, वटवाघूळ, विंचू इत्यादी वन्यजीवांची सुटका आणि पुनर्वसन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त पक्षी पॉज संस्थेकडे पुनर्वसनसाठी येतात. त्यामध्ये पाण्याजवळील पक्षी, शहरी पक्षी, जंगली पक्षी, गवताळ पक्षी ह्यांचा समावेश असतो. अगदी स्थलांतरित पक्षी जसे फ्लेमिंगो, चातक, तीन बोटी खंड्या असे दुर्मिळ पक्षी देखील पॉज संस्थेने पुनर्वसीत केले आहेत.
विविध बदके, बगळे, सागरी ससाणे ते अगदी शहरातील कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घारी, कोकिळा ह्यांना वेळोवेळी वाचवले आहे. प्रत्येक प्रजनन काळात संस्थेने छोट्या पिल्लांना त्यांचा घरट्यात सोडण्याचे काम केले आहे आणि कधी पक्ष्यांची कॉलनि जर झाड पडल्याने विखरली गेली असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एस पी सी ऍ च्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखलही केले आहेत. वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने विविध जखमी पक्ष्यांवर उपचारही केले आहेत.
नुसते स्थलांतरित आणि देशी पक्षी पॉज मध्ये येत नाहीत तर विदेशी ( एक्सओटीक) पक्षी देखील संस्थैत येतात. अगदी लवबर्ड ते टर्की आणि आफ्रिकन पोपट सुद्धा लोक आणून देतात. कधी पिंजरा उघडून पळून गेलेले पक्षी सुद्धा येतात. त्या पक्ष्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते तर लहान पिलाला तात्पुरते पालकही दिले जातात.
संस्थेच्या सदस्या शिल्पा हरकरे या स्वतः लहान पिल्लांना जेवण भरवून ते उडेपर्यंत सांभाळ करतात तसेच सयंसेवक ऋषी सूरसे हे सर्प पुनर्वसनचे काम करतात. बाकीचे वन्यजीव राज मारू, देवेंद्र निलाखे, सुष्मीत कविस्कर करतात.
बरेच वेळा संस्थेकडे अवैधरित्या पकडलेले पक्षी देखील येतात आणि संस्थेचे कार्यकर्ते पुढील पुनर्वसन ठरवतात आणि मदत करतात. विविध साप आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यासाठी संस्थेकडे विशेष हेल्प लाईन आहे ( 9920777536 ) त्यामधून नाग, फुरसे, मण्यार, घोणस हे विषारी साप तसेच नेहमी आढळणारे धामण, कवड्या, नानेट्या आदींचे रिलोकेशन केले जाते. आतापर्यंत बऱ्याच घोरपडी, पाली, रंग बदलणारे सरडे संस्थेने पुन्हा निसर्गात सोडले आहेत.
पॉज संस्थेकडे ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त साधने उपलब्ध आहेत आणि त्यातील बरीच साधने ही स्कॉटलंड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केले आहेत. 2010 मध्ये पॉज संस्थेने डोंबिवली मधील सर्पमित्रांची एक सभा आयोजित केली होती तर 2018 मध्ये निलेश भणगे ह्यांनी सर्प विषयक डेटावर आधारित सर्प संमेलन मध्ये प्रेझेंटेशनही दिले.
संस्थेचे निलेश भणगे यांनी 2005 पासून पाळीव हत्ती या विषयावर संशोधन केले असून महाराष्ट्र आणि गोवा मधील पाळीव हत्तींचा अभ्यास करून कोर्टामध्ये रिपोर्ट सादर केले आहेत. रीसर्चचे 5 रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये सर्कशीतील हत्ती, मंदिर मधील हत्ती, रस्त्यावरिल हत्ती, झु मधील हत्ती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मधील हत्ती आदींचा समावेश आहे.
संस्थेला वन्यजीवसाठी कॉल येतात यामध्ये हरिण, माकड, कोल्हे, ससे, खारी, वटवाघूळ इत्यादी वन्यप्राणी यांची सुटका आणि उपचार केले आहेत. संस्थेकडे वन्यजीव ने आण करण्यासाठी एक रुग्णवाहिका आहे.
निलेश भणगे ह्यांनी वाईल्ड अनिमल रेसक्यू नेटवर्क या आशियामधील मोठ्या कॉन्फरन्समध्ये वेळोवेळी सहभाग घेऊन आपल्या कामाचे प्रझेंटेशन दिले आहेत. 2005 साली फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर कारवाई करून ठाणे जिल्ह्यातील सर्व गारुडी आणि मदारीकडून साप हस्तगत करून त्यांना मेटल आणि मातीचे साप देऊन पुनर्वसन ही केले आहे. 2004 मध्ये नॅशनल सर्कस मधील 12 सिह आणि 2 वाघांची सुटका पेटा या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने केली आणि त्यांना बाणेरघट्ट बंगलोर येथे पाठवले आहे.
संस्थेच्या वतीने विविध शाळा रोटरी क्लब, कॉलेजमधून सर्प विषयी व्याख्यान हे मंदार सावंत आणि चैतन्य कीर देतात. तसेच भारतभर हिंडून प्रख्यात फोटोग्राफरनी काढलेले वन्यजीवांचे निसर्गातील फोटोंचे प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते. यामध्ये सुमारे 40 फोटोग्राफर माध्यमातून सुमारे 300 फोटोचा चालताफिरता संग्रह पॉज संस्थेकडे आहे. विविध पक्षी निरीक्षणचे वेळोवेळी कॅम्प ही आयोजित केले जातात. स्वतः निलेश हे फोटोग्राफर असून त्यांनी अंदमान निकोबारपासून ते अगदी नेपाळ, हॉंगकॉंग, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया येथे जाऊन फोटोग्राफी आणि अभ्यास केला आहे. थायलंड येथे होणाऱ्या दरवर्षीच्या पक्षी स्थलांतर, पक्षीगणना, बर्ड बॅडिंग यामध्ये सहभाग असतो. वन्यजीव सुरक्षा कायदा 1972 बद्दल लोकांमध्ये जागरूकता करण्याचे कामही पॉज संस्था गेली 23 वर्षे करीत आहे.