सोन्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून सणासुदीत मौल्यवान धातू आणखी भाव खात आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढत्या संघर्षाने सोन्याच्या घसरत्या किमतीला ब्रेकच लागला नाहीतर दरवाढीला चालनाही मिळाली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर $१,९७८ प्रति औंस वर पोहोचला असून देशांतर्गत बाजारातही दसऱ्यानंतर आता दिवाळीपर्यंत मौल्यवान धातूच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोन्या-चांदीचा आजचा भाव काय
सोन्या-चांदीच्या किमतीत चढउतार होत असून जर तुम्ही मौल्यवान धातू खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच्या किमतीवर खरेदी करा कारण पुढे किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, २५ ऑक्टोबर रोजी सोने-चांदीच्या फ्युचर्स किमतीत नरमाई दिसून आली. आज दोन्हीच्या फ्युचर्स किमती घसरणीसह व्यवहारास सुरुवात झाली. सध्या चांदीचे फ्युचर्स ७२ हजार रुपयांच्या खाली, तर सोन्याचे फ्युचर्स भाव ६०,५०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या भावी भावात मंदी दिसून आली.
MCX वर सोन्या-चांदीत नरमाई
सोन्याच्या भावी भावात आज किरकोळ घट दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा डिसेंबरचा वायदा आज ५९ रुपये घसरून ६०,५३७ रुपयांवर खुला झाला. यावर्षी मे महिन्यात सोन्याच्या फ्युचर्स किमतीने ६१,८४५ रुपये प्रति १० ग्रॅमची सर्वोच्च पातळी गाठली होती. तर आज एमसीएक्सवर चांदीचा बेंचमार्क डिसेंबर करार आज १५७ रुपयांच्या घसरणीसह ७१,६२९ रुपयांवर खुला झाला.
सोन्याची किंमत आणखी वाढणार
बँकिंग संकटानंतर अमेरिकेत कर्जमुक्तीवरून निर्माण झालेले पेचप्रसंग तसेच दसऱ्यानंतर आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारात सोन्याला जोरदार मागणी राहील, मग लग्नसराईच्या हंगामात भरपूर सोन्याची जोरात खरेदी केली जाईल. अशा परिस्थितीत मौल्यवान धातूची किंमत पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
सोन्याचा भाव उच्चांक मोडणार
सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास यांच्यातील लष्करी संघर्षामुळे जगभरात अनिश्चितता वाढली असून जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहेत, त्यामुळे सोन्याच्या किमतींना मोठा आधार मिळाला असून अशीच परिस्थिती राहिल्यास लवकरच सोने आपल्या मागील उच्चांकी पातळी ओलांडेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.
जागतिक बाजारात सोने-चांदी आपटले
देशांतर्गत बाजाराप्रमाणे जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे वायदे भावात पडझड नोंदवली गेली. कॉमेक्सवर सोने मागील बंद १९८६.१० डॉलर प्रति औंसच्या तुलनेत १९८२.७० डॉलर प्रति औंसवर उघडले. तर चांदीचे फ्युचर्स २३.०६ डॉलर प्रति औंसवर उघडले. गाझा पट्टीमध्ये इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षावर युद्धविराम करण्यासाठी जागतिक नेते दबाव आणत असताना गुंतवणूकदार मध्य पूर्वेतील युद्धावर बारीक लक्ष ठेवून आहेत.