दिवाळीच्या दिवशी रविवारी फटक्यांनी प्रदूषणाची मात्रा वाढल्यावर राज्यातील बहुतांश महत्वपूर्ण शहरातील प्रदूषण कमी झाले. पण चंद्रपुरसह सोलापूर व नागपुरातील प्रदूषणाचा हवा गुणवत्ता निर्देशांक वाढल्याचे समोर आले आहे.चंद्रपुरातील प्रदूषणाची वाईट स्थिती वाढली असून राज्यात चंद्रपूर टॉप दिसून आले आहे.दरम्यान यावर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुंबई, पुणे महानगरांमध्ये हवेचा दर्जा खालावला होता. ठाणे, कल्याण, उल्हानगर, बदलापूर आणि भिवंडी शहरात रात्री उशीरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी झाल्याने सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. सोमवारी उल्हासनगर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरात नोंदविण्यात आला होता. तर बदलापूरमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरात होता. उर्वरित ठाणे, कल्याण आणि भिवंडी शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरात नोंद झाला आहे. रविवारी राज्यातील काही महत्वपूर्ण शहरात प्रदूषणात वाईट स्थितीत पुणे टॉप दिसून आला आला होता. चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर होता. वाईट स्थितीत दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यास बहुतेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे फटक्यांनी स्थिती वाईट झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यरात्री सर्वाधिक प्रदूषित होत आहे. मध्यरात्री पीएम २.५ घटक धोकादायक आणि अतिधोकादायक पातळी गाठत आहे. सर्वच शहरात मध्यरात्री पीएम २.५ चे प्रमाण ३०० ते ५०० (मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) इतक्या प्रमाणात होते. मंगळवारी तर चंद्रपूरचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक २७५ पर्यंत गेला होता. ही घातक स्थिती मानली जात आहे.
प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रदूषणाचा घातक उच्चांक …. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीची मागणी- देशात प्रदूषणाच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या चंद्रपुरातील प्रदूषण पुन्हा घातक पातळीवर पोहोचले आहे. यासाठी प्रशासनाची अनास्था कारणीभूत असून कठोर उपाययोजना करण्याची मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, महासचिव मधुसूदन रुंगठा व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे महासचिव मधुसूदन रुंगठा यांच्यामार्फत प्रदूषणाबाबत हरीत लवादात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हरीत लवाद प्राधिकरणाने महाऔष्णिक वीज केंद्राला दंड ठोठावून वेकोलिवर ताशेरे ओढले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सीटीपीएसने धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व संबंधित यंत्रणा दिवसागणिक होत असलेल्या घातक प्रदूषणाकडे डोळेझाक करीत आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने प्रदूषणाची पातळी जीवघेण्या स्तरावर पोहोचली आहे. आधीच शहर व परिसरातील उद्योग आणि कोळसा खाणींमुळे चंद्रपुरात प्रदूषण होत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीत प्रदूषण आणखी वाढून घातक पातळीवर पोहोचले आहे असे संघर्ष समितीने नमूद केले आहे.
मागील २४ तासातील १० शहरांची सरासरी ‘एअर क्वालिटी इंडडेक्स’
पुणे- १५५
चंद्रपूर – २५९
सोलापूर -२३२
नागपूर – २१४
लातूर – १९७
बदलापूर -१७९
अकोला- १५८
नाशिक – १५५
नवी मुंबई – १५७
जळगाव – ११९
चंद्रपुरातील मागील २४ तासातील सरासरी ‘एअर क्वालिटी इंडडेक्स’
दिवस —— ‘एअर क्वालिटी इंडडेक्स’
१५ नोव्हेंबर २०२३ —— २७५
१६ नोव्हेंबर २०२३ —— २६४