जम्मू आणि कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. यात आज, शुक्रवारी लश्कर-ए-तोयबाच्या 5 जिहादी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना कुलगाममध्ये काही दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचर माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी कुलगामच्या नेहामा गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. कोपऱ्यात अडकलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केल्यानंतर या घेराव आणि शोधकार्याचे चकमकीत रूपांतर झाले. शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याने एका घरातून गोळीबार केला, त्यानंतर चकमक झाली. आतापर्यंत 5 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.
कश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून सांगितले की, कुलगाम पोलीस, भारतीय सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त मोहिमेत 5 दहशतवाद्यांना ठार केले आहे. यावेळी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व साहित्य जप्त करण्यात आल्याचेही ट्विटर संदेशात नमूद आहे.