छगन भुजबळांच्या त्या वक्तव्यानंतर पोलीस कारवाईला वेग; सातारा, धाराशिवमध्ये पोलिसांकडून जरांगेची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या काही सभांवेळी नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती पुढे आली होती. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. रात्री-अपरात्री मनोज जरांगे यांना सभा देण्याची मुभा कशी दिली जाते, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. यानंतर पोलिसांकडून धाराशिव आणि साताऱ्यात मनोज जरांगे यांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिवमधील वाशीत जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा रात्री उशीरापर्यंत सुरु होती. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
या सगळ्या प्रकाराविषयी छगन भुजबळ यांनी भाष्य केले होते. मनोज जरांगे यांच्या १४ सभा झाल्यानंतर मी एकच सभा घेऊन त्यांना उत्तर दिले. आताही त्यांच्या दररोज १० सभा होत आहेत. रात्री १२, २ किंवा ४ वाजातहाी त्यांच्या सभा होतात. त्यांना कायदेशीर बंधने नाहीत. त्यांना ही सगळी मुभा कोणी दिली काय माहिती, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केल्याच्या काही तासांनी पोलिसांनी धाराशिव आणि साताऱ्यात जरांगेंच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे यांनी या सगळ्यावर भाष्य करताना म्हटले की, मी शक्तीप्रदर्शन नव्हे तर राज्यातील मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जात आहे. धाराशिवमध्ये पोलिसांनी आयोजकांवक गुन्हा दाखल केल्याबद्दल मला माहिती नाही, मी त्याबद्दल माहिती घेईन. पण सरकारने हे गुन्हे दाखल करण्याचं चांगलं काम सुरु केलंय. क्रिकेट रात्रभर चालतं, बाकी सगळी केंद्रही राज्यभर चालतात. क्रिकेटच्या इथे आरडाओरडा असूनही सगळं चालतं. असे अनेक प्रकार सुरु असतात. पण गोरगरीबांच्या लेकरांचा प्रश्न मार्गी लागू नये, असे सरकारला वाटत असेले. त्यांना जनतेशी काही देणंघेणं नसेल. सरकार आम्हाला खिंडीत पकडायला बघत आहे. पण आमचा एकही माणूस पोलीस कारवाईला घाबरत नाही. पोलिसांना जी कारवाई करायची असेल, ती करु द्या. पोलिसांवर कदाचित सरकारचा दबाव असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मला कोणीही स्क्रिप्ट देत नाही: छगन भुजबळ
छगन भुजबळ जे काही बोलत आहेत ते सगळे स्क्रिप्टेड आहे, असा आरोप आमदार आरोप रोहित पवार यांनी केला होता. मात्र, भुजबळांनी हे आरोप फेटाळून लावले. मला कधी शरद पवार साहेबांनी स्क्रिप्ट दिली नाही, ना अजित पवारांनी दिली, ना शिंदे किंवा फडणवीस मला स्क्रिप्ट देतात. गेल्या ३५ वर्षांपासून फुले-शाहू-आंबेडकर आणि मंडलचं माझं स्क्रिप्ट आहे, अे छगन भुजबळ यांनी म्हटले. यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी भाष्य केले. मी एकटा पडलेलो नाही. ओबीस समाज माझ्या पाठिशी नाही. काही नेतेमंडळींची अडचण झाली असेल. त्यांनी माझ्या व्यासपीठावर न येण्याची भूमिका घेतली आहे. पण त्यांनी वेगळ्या बैठका घ्याव्यात. आपला उद्देश एकच आहे. मीदेखील संपूर्ण महाराष्ट्रात फिरु शकणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.