टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष डॉ. सामिया सुलुहू हसन यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (मानद पदवी) पदवीने सन्मानित केले. भारत-टांझानिया संबंध बळकट करण्यासाठी, आर्थिक मुत्सद्देगिरीला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक एकात्मता आणि बहुपक्षीयता या क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान; परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
या प्रसंगी संबोधित करताना, डॉ. सामिया सुलुहू हसन एनआयआरडी , हैदराबाद येथे घेतलेल्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य प्रशिक्षणाचा उल्लेख करत आपण भारतीय शिक्षणाच्या मुशीतून घडल्याचे सांगितले. कोणत्याही परदेशी विद्यापीठाने आपल्याला दिलेला हा पहिलाच सन्मान असल्याचे सांगत डॉ. सामिया यांनी हा सन्मान नम्रपणे स्वीकारला.
भारताचे केवळ नैसर्गीक सौंदर्यच नाही तर औदार्य आणि येथील लोकांमधली माणुसकी भारताला “अतुल्य भारत” बनवते, असे त्यांनी सांगितले. भारत हा एक विस्तारित कुटुंब सदस्य आहे जो केवळ समुद्र किनारपट्टीमुळे विभक्त असला तरी भारत एक सामरिक सहयोगी, एक विश्वासार्ह भागीदार आणि नेहमीच मित्र राहिला आहे . ग्लोबल साउथ आणि विकसनशील देशांसाठी भारत कायमच सच्चा आणि एकनिष्ठ राहिला आहे हे त्यांनी अधोरेखित केले.भारताने बहुपक्षीयतेचे महत्त्व कायम राखले आहे आणि बाजारापेक्षा समाजाला (नफ्यापेक्षा लोकांना) महत्त्व दिले आहे ही वस्तुस्थिती असलयाचे सांगत त्यांनी प्रशंसा केली.
धर्मेंद्र प्रधान यांनी डॉ. सामिया सुलुहू हसन यांचे या सन्मानाबद्दल अभिनंदन केले. पहिल्यांदाच आयआयटी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे परदेशातील पहिलेच विद्यापीठ परिसर क्षेत्र (कॅम्पस ) झांझिबारमध्ये उभारले जात आहे आणि या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याचे उद्घाटन होणार आहे, असे सांगत प्रधान यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. टांझानिया आणि इतर आफ्रिकन देशांतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण उपलब्ध करून देऊन ही संस्था दोन राष्ट्रे आणि खंडांमधील शैक्षणिक सहकार्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. सामिया सुलुहू हसन यांना शैक्षणिक सन्मान प्रदान केल्याने भारतासोबतचे त्यांचे दीर्घ संबंध आणि मैत्री अधोरेखित होते असे या कार्यक्रमात बोलताना डॉ. जयशंकर यांनी सांगितले. शिक्षण आणि क्षमता बांधणी हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे महत्त्वाचे पैलू आहेत, असेही ते म्हणाले.