भारतीय संघ आज रविवारी (२९ ऑक्टोबर) लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आहे. भारताने विश्वचषकातील आतापर्यंतचे पाचही सामने जिंकले असून या सामन्यात विजयची डबल हॅट्रिक लगावण्याचा संघाचा प्रयत्न आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच विश्वचषक २०२३ मध्ये प्रथमच फलंदाजीने सामन्याला सुरुवात करणार आहे. यासह रोहित शर्माचा हा इंग्लंडविरुद्धचा सामना भारताचा कर्णधार म्हणून १००वा सामना खेळत आहे. पण टीम इंडिया या सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून खेळत आहे, यामागे नेमके कारण काय आहे; जाणून घेऊया.
भारताचे माजी महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटसृष्टीवर शोककळा पसरली होती. बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने हातावर काळी पट्टी बांधली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर माहिती देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) लिहिले, “आयसीसी पुरुषांच्या वनडे विश्वचषक २०२३ च्या इंग्लंडविरुद्धचा सामन्यामध्ये महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांच्या स्मरणार्थ भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरणार आहे.”
पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या, बेदी यांनी शाळेत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, वयाच्या २०व्या वर्षी भारताची ११३वे कसोटी क्रिकेटपटू बनले. १२ वर्षांच्या कारकिर्दीतील त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी १९६९ मध्ये आली. जेव्हा त्याने कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९८ धावांत सात विकेट घेतल्या, तरीही भारताने हा कसोटी सामना गमावला. १९९० मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाला समुद्रात बुडवण्याची धमकी दिली होती.