ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्यावरुन आमनेसामने येण्याची शक्यता होती. मात्र, शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानात घेण्याचा निर्णय.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असणारा दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असते. मात्र, शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यामुळे गेल्यावर्षी शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार, यावरुन वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. अखेर या कायदेशीर लढाईत ठाकरे गटाचा विजय झाला होता. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही मुंबई महानगरपालिकेला अर्ज दिले होते. मात्र, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने हा अर्ज मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. आमदार सदा सरवणकर यांनीच शिवाजी पार्क येथील मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे, असा अर्ज पालिकेला दिला होता. परंतु, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदा सरवणकर यांनी हा अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेणार आहे. त्याऐवजी आम्ही क्रॉस मैदान, आझाद मैदानासाठी पालिकेला अर्ज दिले आहेत, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मत आहे की, दसरा हा हिंदुंचा सण आहे. या सणात कुठेही वाद होता कामा नये, विघ्न येऊ नये. हिंदुंचा सण आनंदात साजरा झाला पाहिजे. त्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी समजूतदारपणा दाखवत आझाद किंवा क्रॉस मैदानात दसरा मेळाव्याची तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा विनासायास पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्यावर्षी दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाने प्रतिकात्मक लढाईत बाजी मारली होती. अखेर शिंदे गटाने आपला दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेतला होता. तसेच या सगळ्या प्रकारामुळे ठाकरे गटाच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली होती. यंदाही अशाप्रकारची कायदेशीर लढाई झाल्यास ठाकरे गटाला पुन्हा सहानुभूती मिळू शकते, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली होती. त्यामुळेच शिंदे गटाने यंदा हा वाद न वाढवता अगोदरच माघार घेतल्याची चर्चा रंगली आहे.