डार्क वेबवर तब्बल 81.5 कोटी भारतीय नागरिकांचा आधार डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीने दावा केला आहे की, 81.5 कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की 9 ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी 81.5 कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित रेकॉर्डची माहिती दिली आणि ते विकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अहवालानुसार, व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती 80 हजार डॉलरमध्ये विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता हॅकरने ट्विटरवर (एक्स) 80 कोटींहून अधिक भारतीयांचा खाजगी डेटा लीक केल्याची माहिती दिली आहे.लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वयाची माहिती समाविष्ट आहे. मात्र, आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी ऑगस्टमध्ये लुसियस नावाच्या दुसर्या व्यक्तीने ब्रीच फोरमवर 1.8 टेराबाइट डेटा विकण्याची ऑफर दिली होती.
एप्रिल 2022 मध्ये ब्रुकिंग्सच्या अहवालानुसार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी युआयडीएआयची तपासणी केली होती आणि असे आढळून आले की, प्राधिकरणाने त्यांच्या ग्राहक विक्रेत्यांचे प्रभावीपणे नियमन केले नाही आणि त्यांच्या डेटा व्हॉल्टच्या सुरक्षिततेचे संरक्षण केले नाही. दरम्यान अमेरिकन कंपनीच्या गौप्यस्फोटानुसार हा डेटा इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधून (आयसीएमआर) लिक झाल्याची शक्यता आहे. दरम्यान आयसीएमआरने अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.