स है जोंधळे विद्यामंदिर शाळेतील इंग्रजी माध्यमात इयत्ता 5 अ- ब च्या एकूण 80 विद्यार्थ्यांना शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना गणिते येत नाहीत यामुळे शिक्षिका नीलम भारमल हिने मारहाण केली. काल गुरुवारी अनेक मुली-मुले विद्यार्थ्यांना रॉडने आणि काठीने मारण्यात आली अशी पालकांची तक्रार आहे. पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक यांना याविषयी विचारणा केली. मात्र मुख्याध्यापकांकडून रितसर उत्तर न मिळाल्याने पालकांनी शाळेच्या विरोधात उठाव केला. यावेळी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत येऊन जाब विचारला. संबंधित शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना (उबाठा) व मनसे यांनी केली.
याबाबत बालमणी मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम भारमल या काही दिवसांपूर्वीच शाळेत दाखल झाल्या आहेत. त्यांची केवळ मुलाखत घेतल्यानंतर त्या वर्गावर गेल्या होत्या त्या दिवशी नक्की काय झाले असे त्या शिक्षिकेला विचारले पण त्यांनी काहीच सांगितले नाही. पालकांनी याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे समजते.
विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच शिवसेना (उबाठा) चे स्थानिक नेते तात्यासाहेब माने यांनी मुख्याध्यापक यांना खडसावले. पालक आपल्या मुलाला शिक्षणासाठी शाळेत पाठवतात पण शिक्षक अशी गुरांसारखी मारहाण कशी करतात. तुमच्याकडे त्या शिक्षिकेची माहिती असेल तर द्या आम्ही त्या मॅडमना धडा शिकवतो. लहान मुलांना पाठीवर, हातावर वळ उठले आहे, शिकविण्याची ही कोणती पद्धत ?
याबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे म्हणाले, शाळा प्रशासन शिक्षक आणि पालक यांची मिटिंग घेऊन हा प्रश्न सोडवू असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही यावेळी शांत राहिलो, पण शाळा प्रशासन आणि शिक्षक यांचे साटेलोटे आहे. जो शिक्षक शाळेत कार्यरत आहे त्याची वैयक्तिक माहिती शाळेकडे नसणे हे कितपत शक्य आहे. जर या शिक्षिकेला पाठीशी घातलं तर मनसे स्टाईलने याचा समाचार घेऊ. तर विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी संबंधित शिक्षिका विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.