ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे लवकरच सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. उत्तराखंडमधील पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 35 व्या दीक्षांत समारंभात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेपासून हे विद्यापीठ कृषी शिक्षण, संशोधन आणि वाढीसाठी उत्कृष्टतेचे केंद्र बनले आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी पंतनगर विद्यापीठाला ‘हरितक्रांतीचे अग्रदूत’ असे नाव दिल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. नॉर्मन बोरलॉग यांनी विकसित केलेल्या मेक्सिकन गव्हाच्या वाणांची या विद्यापीठात चाचणी घेण्यात आली आहे. हरितक्रांतीच्या यशात बोरलॉग यांचा प्रभावी वाटा आहे. कृषी क्षेत्राशी निगडित प्रत्येकाला ‘पंतनगर बियाणे’ माहिती आहे. देशभरातील शेतकरी पीक गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यासाठी पंतनगर विद्यापीठात विकसित केलेले बियाणे वापरतात, असे त्यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर होत असलेल्या तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींच्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेला गती देणे आवश्यक आहे यावर राष्ट्रपतींनी भर दिला. आज हवामान बदल आणि मातीच्या कसाचा ऱ्हास यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी जग नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करत आहे, असे त्या म्हणाल्या. आहाराच्या पर्यावरणपूरक सवयींनाही प्रोत्साहन दिले जात आहे. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये भरड धान्याला प्राधान्य मिळवून देण्यात या विद्यापीठातील संशोधक, शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक महत्त्वाची भूमिका बजावतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी देखील हे विद्यापीठ पावले उचलत आहे. काही मिनिटांत अनेक हेक्टर जमिनीवर फवारणी करता येणारे स्वतःचे कृषी ड्रोन या विद्यापीठाने विकसित केले आहे, याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.