जालना: बीडमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ कलमातंर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यावरुन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांना मारहाण करुन आणि अन्य आंदोलकांवर ३०७ चा गुन्हा दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवांत झोप आली असेल. उपमुख्यमंत्री जाणुनबुजून इंटरनेट बंद करत आहेत. त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो, असे लोकांना वाटत आहे. हा गंभीर आरोप वाटत असेल, पण मी हे थेट सांगत आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भीत नाही. तुमचं करिअर बरबाद करायचं की चांगलं, हे मराठ्यांच्या हातात आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. ते बुधवारी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला. देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये घरांची जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवर ३०७ चा गुन्हा दाखल होईल, असे म्हटले होते. यावरुनच मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे उपमुख्यमंत्री गोड बोलतात आणि दुसरीकडून आंदोलकांवर ३०७ चे गुन्हे दाखल करतात. त्यांच्यामुळेच भाजप संपायला लागली आहे. गोरगरीबाच्या कार्यकर्त्याला मार बसवतो आणि स्वत:ला उच्च नेता म्हणवतो. आता तुला समजेल की, तू उच्च नेता आहे की, मतदानाच्या चिठ्ठ्या वाटण्याच्या लायकीचा आहे, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी केली.
तसेच आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण न दिल्यास किंवा विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास मी पाणीत्याग करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. सरकार मला आमरण उपोषणावरुन उठवू शकत नाही. राज्य सरकारचा १०० टक्के डाव आहे की, मला आंदोलनावरुन उठवायचे. आंदोलन खूप मोठे झाले आहे,असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटत आहे. परंतु, मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय उठणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.