नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर हा गेल्या ५ महिन्यांपासून तयार झालेला मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पण रखडले होते. त्यामुळे या मार्गावर असलेल्या ११ स्थानकातील नागरिकांना वेटीस धरले होते. या मार्गावरून दिवसाला ३ ते ५ वेळा मेट्रो प्रवाशांशिवाय चालवली जात होती. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामार्फत नवी मुंबईत सह्यांची मोहिम स्थानकात राबविल्यानंतर सामान्य प्रवाशांनी पंतप्रधान व सिडको महामंडळाच्या कारभाराविषयी तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्याने दिवाळी नंतर का होईना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिल्याने नवी मुंबईकरांना १२ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळाला आहे.
हा निर्णय घेतल्याने खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देवून आभार मानून ऐरोली- कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पातील गेल्या ७ महिन्यांपासून तयार झालेले दिघा गाव रेल्वे स्थानक याच धर्तीवर सुरू करावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे हे रेल्वे स्थानक तयार होवून प्रवाश्यांच्या प्रतीक्षेत आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री व रेल्वे राज्य मंत्री यांना ४ ते ५ वेळा स्मरण पत्र देवून सुद्धा दिघा गाव रेल्वे स्थानक सुरु करत नाही. या दिघा परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या आयटी कंपन्या व त्यामध्ये बाहेरून येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो त्यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ व पैशाची बचत टाळण्यासाठी दिघा गाव रेल्वे सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून रेल्वे स्थानक तयार केली हा आर्थिक भार भरून निघावा यासाठी रेल्वेचे उत्पन्नही घटले आहे असेही पत्रामध्ये म्हटले आहे.