देशाच्या किरकोळ महागाई दरात मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये 6.83 टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आला आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यांच्या महागाई दरातही घट झाली आहे. इकॉनॉमिस्टच्या सर्वेक्षणातही किरकोळ महागाईत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये घसरून 5.02 टक्क्यांवर आला आहे. तो जून 2023 नंतर सर्वात कमी आहे. ऑगस्टमध्ये दर 6.83 टक्के आणि जुलैमध्ये 7.44 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेली आकडेवारी आरबीआयने निश्चित केलेल्या महागाईच्या समाधानकारक (6 टक्के) श्रेणीपेक्षा कमी आहे. यामुळे आगामी पतधोरण आढाव्यात आरबीआय व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय घेण्याच्या स्थितीत येईल. एनएसओ महागाईचे आकडे 1114 आणि 1181 ग्रामीण भागातून गोळा करते. सप्टेंबर 2023 मध्ये कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स घसरून 188.3 या पातळीवर आला आहे. तो ऑगस्टमध्ये 192.5 होता. देशात ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादन दर 10.03 टक्के होता. निर्मिती क्षेत्रात 9.3 टक्के आणि खाण उत्पादनात 12.3 टक्क्यांची वाढ झाली.
सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे भाज्यांचा महागाई दर ऑगस्टमध्ये 26.14 टक्के होता तो 3.39 टक्क्यांवर आला आहे. मात्र, डाळींच्या भाववाढीचे प्रमाण वाढले आहे. डाळींच्या महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 16.38 टक्के झाला आहे जो ऑगस्टमध्ये 13.04 टक्के होता. महागाईबाबत, आरबीआयने 6 टक्के अंदाज वर्तवला होता. आरबीआयने महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आरबीआयने 2024-25 चे ग्राहक किंमत निर्देशांकाचे (सीपीआय) लक्ष्य 4.5 टक्के ठेवले आहे.