देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वेचा आगामी 31 डिसेंबर रोजी शुभारंभ होणार आहे. सार्वजनिक परिवहन क्षेत्रात कायम आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ही अंडरवॉटर-मेट्रो सुरू होणार आहे.
पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन ते महाकरण स्टेशन असा 520 मीटर लांबीचा प्रवास मेट्रो एका बोगद्याद्वारे पूर्ण करेल. या अंडरवॉटर मेट्रोसाठी जमिनीपासून 33 मीटर आणि हुगळी नदीच्या पृष्ठभागाच्या 13 मीटर खाली 520 मीटर लांबीच्या बोगद्यात दोन ट्रॅक टाकण्यात आले आहेत. ही ट्रेन 80 किमी/तास या वेगाने फक्त 45 सेकंदांत बोगदा पार करेल. या बोगद्याद्वारे हावडा थेट कोलकात्याशी जोडला जाईल आणि दररोज 7 ते 10 लाख लोकांचा प्रवास सुकर होईल. गेल्या 21 एप्रिल रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती. देशातील पहिल्या मेट्रो ट्रेनला 1984 साली कोलकाता येथे सुरुवात झाली होती. मार्ग उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (ब्लू लाइन) होता. त्यानंतर तब्बल 39 वर्षांनंतर पहिली अंडरवॉटर मेट्रो देखील पश्चिम बंगालमध्येच सुरू होतेय. सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात पुन्हा एकदा कोलकात्याचे नाव नोंदवले जाणार आहे.