नांदेड : ठाण्यातील रुग्णालयात एकाच दिवसांत १८ जणांच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना नांदेडमधूनही अशीच धक्कादायक बातमी येतीये. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे १२ नवजात बालकांचा यात समावेश आहे. नांदेडमधल्या या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेली आहेत.
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. ठाण्यात एका रात्रीत १८ मृत्यूचं प्रकरण समोर आल्यावर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. या घटनेला उणापुरा दीड महिना उलटत नाही तोच नांदेडमधूनही असाच प्रकार समोर येतोय.
गेल्या २४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी हात वर केले आहेत. मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णांचा जास्तीचा समावेश होता, असा दावा करून वेळ मारून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाले होते. रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधा आणि रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ ही कारणं या मृत्यूंमागे असल्याचं सरकारचं म्हणणं होतं. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचं या घटनेनंतर अधोरेखित झालं होतं.
१८ रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने काय सांगितलं होतं?
जे रुग्ण दगावले त्यातील काही रुग्णांचा अपघातग्रस्त, तर काहींचा अल्सर, यकृत व्याधी, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, लघवी संसर्ग, ऑक्सिजनची कमतरता, रक्तदाब कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले होते. मृतांमध्ये एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेसह ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश होता. तर उर्वरितांमध्ये ३३ ते ८३ वयोगटातील रुग्णांचा समावेश होता.