नांदेड शासकीय रुग्णालयात ४१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयातील मृत्यू संख्या ४१ वर
नांदेडच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. सलग तिसऱ्या दिवशी या रुग्णालयात ६ रुग्णांचे मृत्यू झाले. यात दोन नवजात बालक आणि ४ प्रौढ पुरूषांचा समावेश आहे. त्यामुळं एकूण मृत्यू संख्या आता ४१ वर पोहोचली असून गंभीर बाब म्हणजे यात तब्बल २२ बालकांचा समावेश आहे. तर अजूनही २५ हून अधिक बालकं अत्यवस्थ आहेत. सद्यस्थितीत या रुग्णालयात ८२३ रुग्ण भरती असल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, या प्रकरणात कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना बाहेरून ४५ हजारांहून अधिकची औषधी खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले होते. तसेच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करण्यात आले होते. त्यात अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
कामाजी टोम्पे यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, रात्री १ वाजेच्या सुमारास अंजली यांची नैसर्गिक प्रसूती होऊन तिला मुलगी झाली. प्रसूती झाली तेव्हा अंजली व तिच्या बाळाची तब्येत चांगली असल्याचे तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, सकाळ झाल्यानंतर अंजलीचे रक्त जास्त जात आहे. बाळाची तब्येत बिघडली आहे, असे डॉक्टारांनी सांगितले. तसेच, रक्ताचे व पेशीचे पॉकेटसह इतर मेडीकल बाहेरून आणण्यासाठी सांगितले गेले. त्यानंतर कामाजी टोम्पे यांनी मेडीकल साहित्य बाहेरून आणून डॉक्टारांना दिले. परंतु, त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी अधिष्ठाता वाकोडे यांच्याकडे धाव घेतली. माझ्या मुलीचे व तिच्या बाळाची प्रकृती गंभीर असून रक्त जास्त जात आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टर पाठवा अशी विनंती केली. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई न करता जाणूनबुजून कामाजी टोम्पे यांना तिथेच बसून ठेवले. बराच वेळ झाल्यावरही कोणतेही डॉक्टर व नर्स पाठवण्यात आले नाही. अंजली आणि त्यांचे बाळ मरणाच्या दारात असताना सुद्धा वाकोडे यांनी कोणतेही हालचाल केली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.