नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या विंचूर चौफुली येथे कौटुंबिक वादातून एका इसमाने स्वत:च्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून असलेल्या अरुण दाभाडे व पत्नी पूजा अरुण दाभाडे यांच्यामध्ये घरगुती वाद झाले. अरुण दाभाडे यांनी पत्नीच्या डोक्यात कोयत्याच्या सहाय्याने वर्मी घाव घालून तिला गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांनी आरोपी अरुणला पोलिसांच्या ताब्यात देत जखमी पत्नीला उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल केले
सध्या तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिची प्रकृती गंभीर आहे. पुढील उपचारासाठी तिला नाशिक येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना समजताच शहर पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत