दसऱ्याच्या मुहूर्तावर निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. भाजपच्या पक्षांतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीबद्दल जिल्ह्यात चर्चा होत होती.
नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच माजी खासदार नीलेश राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी “टायगर इज बॅक” अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. सध्या हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
“मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे.” अशा आशयाचं ट्विट नीलेश राणे यांनी केलं होतं. दसऱ्याच्या मुहूर्तावर केलेल्या ट्विटमुळे भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. भाजपच्या पक्षांतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीबद्दल जिल्ह्यात चर्चा होत होती.
काही वर्षांपासून नीलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तशी त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी देखील सुरू केली होती. या ट्वीटनंतर सिंधुदुर्गातून नीलेश राणे यांचे काही कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यातच कुडाळ नगरपंचायतीमधील दोन नगरसेवक अभिषेक गावडे आणि प्राजक्ता शिवलकर यांनी राजीनामेही दिले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे पुत्र नीलेश राणे यांनी अचानकपणे जाहीर केलेल्या राजकीय निवृत्तीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नीलेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अवघ्या २४ तासांतच नाराजी दूर झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी नीलेश राणेंचे मतभेद असल्याची चर्चा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम करण्याच्या सूचना फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर राणे व चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमधील मतभेद मिटले आहेत.
पालकमंत्री चव्हाण आणि पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांशी असलेल्या मतभेदांमुळे आणि कार्यकर्त्यांच्या कामांसाठी शासकीय निधी मिळत नसल्याने नीलेश राणे यांनी समाजमाध्यमांवरून सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. नीलेश यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या कामांसाठी जिल्हा निधीतून पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही याची खंत निलेश राणे यांना कायम होती.
नीलेश राणे हे विधानसभेसाठी इच्छुक असून ग्रामपंचायत व अन्य निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने नाराज होते. त्यामुळे नीलेश राणे यांनी निवृत्ती जाहीर केली. बुधवारी नीलेश राणे यांची भेट घेऊन मनधरणी केली. या दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी चर्चा केली. कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने राणे रागावले होते. आता नीलेश राणे यांनी सुचवलेल्या कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.