मान्सून परत गेल्यानंतर लगेच पुणे शहरात उकाडा जाणवू लागला आहे. किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने पुणेकरांना आताच उकाड्याने हैराण केले आहे. येत्या आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
सध्या मॉन्सून देशातून जवळपास परतीच्या वाटेवर गेला आहे. महाराष्ट्रातून पूर्णपणे निरोप घेतला आहे. मॉन्सून गेला आणि लगेच तापमानात उष्णता वाढू लागली आहे. पहाटे मात्र पुणे शहराच्या आसपास धुके दाटून येत आहे. धुक्यामुळे सकाळी छान वाटत असले, तरी दुपारी मात्र उकाडा चांगला वाढला आहे. २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या पुढे गेले होते. तसेच अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती आणि सोलापूर येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. राज्यामध्ये मुख्यतः कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शहरातही आकाश निरभ्र राहणार आहे.