बेडेकर मसाल्याचे संचालक अतुल वसंत बेडेकर यांचे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेडेकर यांच्यावर आज, शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली म्हणून बेडेकर समूहाची सर्व दुकानं आज बंद ठेवली जाणार आहेत.
बेडेकर समूहाला तब्बल १२३ वर्षांची परंपरा आहे. अतुल बेडेकर हे चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. बदलत्या काळाशी जुळवून घेत व्यवसायात टिकून राहण्यासाठी व्ही.पी. बेडेकर यांचे चिरंजीव व्ही.व्ही. बेडेकर यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. १९१७ मध्ये त्यांनी वेगवेगळे मसाले आणि १९२१ साली लोणची बाजारात आणली. बघता-बघता बेडेकर मसाले व लोणच्यांनी खवय्यांचे लक्ष वेधून घेतले. पुढं ठाकूरद्वार, परळ, दादर आणि फोर्ट इथं बेडेकर दुकानांचा विस्तार झाला आणि ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. सध्या या उद्योगाची उलाढाल १०० कोटींहून अधिक आहे.
बेडेकर कुटुंब एक यशस्वी उद्योगपती आणि व्यावसायिक असण्यासोबतच सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. बेडेकर यांनी सांस्कृतिक विस्तारासाठी ‘व्यासपीठ ज्ञान-मनोरंजन’च्या माध्यमातून ‘मार्गशीर्ष महोत्सव’ आणि ‘वसंत महोत्सव’ आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आज हा सण केवळ बेडेकर कुटुंबाचाच नव्हे, तर गिरगावातील तमाम रहिवाशांचा शुभ सण बनला आहे. शंभर वर्षांची विश्वासार्ह परंपरा लाभलेल्या बेडेकर कुटुंबाने एक आदर्श उद्योगपती, कार्यक्षम व्यापारी, जबाबदार समाजसेवक तसेच राष्ट्रीय विचारधारेचे पालनपोषण करणारे म्हणून समाजात आणि व्यावसायिक जगतात उच्च स्थान प्राप्त केले आहे.
बेडेकर लोणचे आणि मसाले ब्रँडची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. व्ही.पी. बेडेकर यांनी रत्नागिरीतील घर सोडले आणि १९१० मध्ये मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी किराणा दुकान टाकले. त्यांनी किराणाचा व्यवसाय वाढवला. पुढे त्यांनी आपला मुलगा वासुदेव (अण्णासाहेब) यांना मदतीला घेतले. जसजशी वर्षे सरत गेली तसतशी व्ही.पी. बेडेकरांनी अण्णासाहेबांना कारभाराची जबाबदारी दिली. अण्णासाहेबांनी शेवटी किराणा स्टोअरचा विस्तार मल्टी-स्टोअर, ट्रेडमार्क ब्रँडमध्ये केला. १९२१ मध्ये बेडेकरांनी स्वतःचे लोणचे आणि मसाले तयार करण्यास सुरुवात केली. मसाले, लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर १९४३ मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचे नामकरण केले. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. फक्त देशात नाही तर ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहोचला, तिथे तिथे बेडेकर उत्पादनंही पोहोचली. १९६० मध्ये भारतात प्रथम पी.पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या आणि मग लोणचं निर्यात होऊ लागले. कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास ६०० टन लोणचं सीझनला बनते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहोचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.
एकेकाळी पारंपारिक घरगुती गोड म्हणून ओळखला जाणारा मोदक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बेडेकर’ या अभिमानास्पद ब्रँड नावाने ओळखला जातो. दर्जेदार उत्पादने, ग्राहकांच्या अभिरुचीची समज, अपेक्षेनुसार बदल आणि काळाच्या सुसंगतपणे व्यवसाय वाढवण्याचे अनुभवी कौशल्य यामुळे बेडेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. बेडेकर यांनी केवळ व्यवसाय आणि उद्योग चालवले नाहीत, तर चार पिढ्यांपासून समाज आणि ग्राहकांशी घनिष्ठ नाते निर्माण केले आहे. ग्राहक आणि ग्राहकांचा अतूट विश्वास हेच त्यांचे खरे व्यावसायिक भांडवल आहे. त्यांच्या निर्मितीला देश-विदेशात मान मिळाला, ही केवळ मराठी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.