मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काल जाहीर झाल्या आहेत. भाजपनं यापैकी तीन राज्यात १८ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.
निवडणूक आयोगानं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखांची काल घोषणा केली आहे. भाजप, काँग्रेस, भारत राष्ट्र समिती यांच्यासह त्या त्या राज्यांमधील पक्षांकडून विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली होती. काल, निवडणूक आयोगानं पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर भाजपकडून राजस्थान आणि छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपनं या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत १८ खासदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये ४ केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे.
भाजपनं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी ७ खासदार आणि छत्तीसगडमध्ये ४ खासदारांना उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्या ७ खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामध्ये ३ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.भाजपला गेल्यावेळी विधानसभेच्या जागांवर निवडणुकीत विजय मिळवता आला नव्हता, त्या जागांवर केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
भाजपनं सोमवारी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसाठी नवी उमेदवारांची यादी जाहीर केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना त्यांच्या बुधनी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपनं आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये २३० पैकी १३६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
भाजपनं छत्तीसगडच्या ९० जागांपैकी ६४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मध्ये केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार गोमती साय, अरुणा साव आणि विजय बघेल यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.
भाजपनं राजस्थानमध्ये सात खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. यामध्ये खासदार राज्यवर्धन राठोड, नरेंद्र कुमार, दीया कुमारी, किरोडी लाल मीणा, बाबा बालकनाथ, भगगिरथ चौधरी आणि देवजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपनं मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, फग्गन सिंह कुलास्ते आणि प्रल्हाद सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याशिवाय मध्य प्रदेशातील भाजपचे चार खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.