भारताने मानव जातीच्या व्यापक कल्याणासाठी अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला पाठींबा दिला आहे. बाह्य अवकाशाचा वापर केवळ शांततापूर्ण कामांसाठी करायला आणि तो संघर्षमुक्त ठेवायला आम्ही वचनबद्ध आहोत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. ते नवी दिल्ली येथे सुषमा स्वराज भवनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या समकालीन चीन अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या ‘अंतराळ – जागतिक नेतृत्वाचा शोध घेणाऱ्या चीनसाठी अंतिम सीमा’ या विषयावरच्या दोन दिवसीय परिषदेत त्यांनी बीज भाषण केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “अवकाश क्षेत्रात, आम्ही पारदर्शकता, जबाबदारी आणि अवकाशाचा शांततापूर्ण वापर या तत्त्वांचे सातत्याने पालन केले आहे. आणि म्हणूनच, आम्ही चीनसह इतर प्रत्येक देशाला इतरांशी मुक्त संवाद साधण्याचे आवाहन करत आहोत. जेणेकरून कोणतीही गोपनीयता अथवा संशय न बाळगता आपण एकमेकांची मिशन आणि उपक्रमांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करू आणि एक सुरक्षित स्थिर वातावरण जपण्याची खात्री देऊ.”
भारताचा अंतराळ कार्यक्रम केवळ जागतिक पातळीवर स्पर्धात्मक नसून सर्वोत्तमही आहे, हे अधोरेखित करून, भारताचा अंतराळ कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण असून सामान्य नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ आणण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जगातील आघाडीच्या अंतराळ संस्थांबरोबर सहकार्य करत आहे, या गोष्टीचा डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुनरुच्चार केला.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताच्या अंतराळ मोहिमा मनुष्यबळ आणि कौशल्यांच्या आधारावर किफायतशीर ठरतील अशा पद्धतीने आखल्या गेल्या आहेत.
भारताचे अंतराळ क्षेत्र “अनलॉक” (खासगी क्षेत्रासाठी खुले) झाल्यामुळे भारताची प्रचंड क्षमता आणि प्रतिभेला संधी मिळाली आणि जगापुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण झाले. परिणामी, भारताच्या अंतराळ शास्त्रज्ञांना त्यांचे संस्थापक विक्रम साराभाई यांचे स्वप्न पूर्ण करता आले. या गोष्टीचे संपूर्ण श्रेय डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
“पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील सर्व चुकीच्या धारणा बाजूला ठेवल्या आणि हे क्षेत्र खाजगी उद्योजकांसाठी खुले केले. 2014 मध्ये केवळ 4 अंतराळ स्टार्टअप्सपासून सुरुवात करून, आज केवळ 3-4 वर्षात आपल्याकडे या क्षेत्रातील 150 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत,” असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.