पुणे : पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे भारत विरुद्ध बांग्लादेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना सुरू आहे. सामना सुरू होण्याच्या पूर्व संध्येला तिकीट विक्री जादा दराने सुरू आहे. १२०० रुपयांचे तिकीट १२ हजार रुपयांना विकणाऱ्या दोन दलालांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांच्यावतीने ही मुकाई चौक, रावेत येथे बुधवारी (दि.१८) रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदाराच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना पुण्यात खेळला जात आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश गहुंजे स्टेडियम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे तिकीट एक हजार दोनशे रुपये दराचे तिकीट बारा हजार रुपयांना एक अशा दहापट जास्त दराने काही दलाल विक्री करीत आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी व अंमलदार सापळा रावेत हद्दीत दोघांना अटक केली आहे.
रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवली असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना ३० ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. साध्या वेशातील पोलीस मागील काही दिवसांपासून स्टेडियम आवारात गस्त घालत आहेत.
दरम्यान, भारत बांगलादेश यांच्यातील लढत पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरु असून मोठ्या संख्येनं क्रिकटचे चाहते मैदानावर सामनना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. बांगलादेशनं सावध सुरुवात केल्यानंतर भारतानं देखील लागोपाठ विकेट काढत सामन्यात कमबॅक केलं आहे. बांगलादेशकडून दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं झळकवली.