एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत येत्या शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादमध्ये होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबईहून अहमदाबादसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या गाड्या मुंबई सेंट्रल स्थानकातून अहमदाबादला रवाना होतील. याशिवाय नियमित धावणार्या वन्दे भारत आणि अन्य गाड्याही आहेत.
यामध्ये गाडी क्रमांक ०९०१३ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेन शुक्रवार, १३ ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता मुंबईतून रवाना होईल. जी गाडी शनिवार, १४ तारखेला पहाटे ५.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. याचसोबत सामना संपल्यानंतर रविवार, १५ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजता एक गाडी अहमदाबादवरून मुंबईला रवाना होईल. गाडी क्रमांक ०९०१४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेन त्याच दिवशी दुपारी १२:१० पर्यंत मुंबईत दाखल होईल.
या सुपरफास्ट विशेष ट्रेनला दादर, बोरीवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत या स्थानकांवरच थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही गाड्यांचे बुकिंग आज, गुरुवारी (१२ ऑक्टोबर) सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यासाठीची सर्व तिकीटं जवळपास विकली गेली असून आजुबाजूची हॉटेलही बुक झाली आहेत. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहते अहमदाबादमध्ये येतील.