ठाणे : कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. घाटकोपरमधील भटवाडी स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे.
वैशाली यांना मधुमेह होता. मधुमेहाने ग्रस्त असतानाच त्यांच्या पायाला गँगरीन झालं. केईएम रुग्णालयात त्यांच्यावर गँगरीन उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
वैशाली शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या आंबेडकरी चळवळीला बळ देत होत्या. त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून गाण्याचं बाळकडू मिळालं. त्यांचे आई – वडील रामचंद्र आणि सरुबाई क्षीरसागर हे दोघंही आंबेडकर तसंच बुद्धांची गाणी म्हणायचे त्यातून वैशाली या गाणी म्हणू लागल्या.
४ एप्रिल १९६२ मध्ये सोलापुरातील मोहोळ तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्या अतिशय अतिदुर्गम गावात मोठ्या झाल्या. वैशाली यांचे आई-वडील दोघंही मजुरीचं काम करायचे. नंतर गावातून ते कामासाठी पुण्यात आले.
वैशाली यांचं खरं नाव दया क्षीरसागर होतं. पण विष्णू शिंदे यांच्याशी लग्नानंतर त्या वैशाली शिंदे ओळखल्या जाऊ लागल्या. लग्नानंतर त्या मुंबईत आल्या होत्या. मुंबईत त्यांची भेट कवी लक्ष्मण राजगुरु यांच्याशी झाली. त्यांनी गाण्यातील अनेक बारकावे वैशाली यांना शिकवले. त्यातून त्या गायिका म्हणून पुढे आल्या.