मणिपूर येथे पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान काकचिंगच्या वांगू लिफाम भागात शोध मोहीम राबवली. या काळात घरे आणि टेकड्यांमधून मोठ्या प्रमाणात हायटेक शस्त्रे आणि चीनी ग्रेनेड जप्त करण्यात आले. या शोध मोहिमेबाबत पोलिसांनी आज, बुधवारी अपडेट दिला.
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या पथकाने टेकडीवर जाऊन शोध घेतला. यावेळी टेकडीवरील स्मशानभूमीजवळून काही शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. यात एक एके 47, एक इन्सास रायफल, 5 एसएलआर रायफल, एक 303 रायफल (सुधारित), तीन 303 रायफल, दोन एसबीबीएल, 11 एचई ग्रेनेड, एक चिनी हँड ग्रेनेड, एके-47 आणि इन्सास रायफल प्रत्येकी 1 असल्याचे त्यांनी सांगितले. रिकामी मॅगझिन, एसएलआर रायफलची 5 रिकामी मॅगझिन, 6 डिटोनेटर, स्थानिक पाईप बॉम्बसह अनेक शस्त्रे सापडली आहेत.
शोध मोहिमेदरम्यान वांगू लिफाम चिंग्याच्या अनेक घरांची झडती घेण्यात आली. यापूर्वी सोमवारी मणिपूर पोलिसांनी म्यानमारमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मंगळवारी, 24 ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, राज्य सामान्य स्थितीकडे जात आहे. लवकरच येथील लोक आनंदाने जगतील. काही विदेशी संघटना राज्याला लक्ष्य करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासोबतच नागपुरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात 24 ऑक्टोबर रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील मणिपूर हिंसाचाराला सुनियोजीत कट म्हंटले होते. मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदाय वर्षानुवर्षे एकत्र राहतात. त्यांच्यात जातीय वणवा कसा सुरू झाला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडून कट्टरपंथीही होते का? असा सवाल सरसंघचालकांनी उपस्थित केला होता. मणिपूरमधील अशांतता आणि अस्थिरतेचा फायदा परकीय शक्तींना होऊ शकतो. देशात मजबूत सरकार असूनही एवढा काळ कोणाच्या जोरावर हा हिंसाचार सुरू आहे ? असा मुद्दा देखील भागवतांनी मांडला होता.