आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालयातील कान- नाक -घसा व भूलशास्त्र विभागातील डॉक्टरांनी तीन लहान मुलांच्या घशात अडकलेल्या वस्तु बाहेर काढण्यासाठी तत्काळ शस्त्रक्रिया करत या तिन्ही मुलांना जीवदान दिले आहे. मुलांना होणाऱ्या वेदनेमुळे या तिन्ही मुलांचे पालक चिंतेत होते, मात्र मविप्र रुग्णालयातील डॉक्टरांनी या पालकांच्या चेहऱ्यावरील काळजी दूर केली आहे.
आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व मविप्र रुग्णालय येथे नाक कान व घसा विभागा अंतर्गत हे तीन लहान मुले उपचारासाठी दाखल झाली होती. कान नाक घसा विभागातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करत यात एक वर्षाच्या बाळाने तीन सेंटीमीटर आकाराचे गळ्यातील पदक तर दोन वर्षाच्या बाळाने चपटा बॅटरी सेल आणि चार वर्षाच्या बाळाने पाच रुपयाचे नाणे गिळले होते. त्यामुळे तीनही बालकांना श्वास घेण्यास त्रास होऊन अन्न गिळणे अवघड झाले होते. यावर कान नाक घसा विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ.श्रीया कुलकर्णी , सहयोगी प्राध्यापक डॉ. ऋषिका पटेल ,डॉ. दिव्या बंगेरा व इतर तज्ञ डाॅक्टर्स यांनी या बाळांची तपासणी करत निदान केले व शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले. तिन्ही बाळांवर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यात कान नाक घसा व भूलशास्त्र विभागातील तज्ञ डॉक्टर्स यांचा या टीममध्ये समावेश होता.
तिन्ही मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या पालकांनी मविप्र रुग्णालय व त्यांना घसा विभागातील डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी व संचालक तसेच शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी डॉक्टरांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहेत.