महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या घालून दहशत माजवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन किलो चांदी, एक पिस्टल, दोन दुचाकी, दोन चारचाकी असा ६ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार आणि जेलरोड हद्दीतील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले.
सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रमुख विक्रम देशमुख यांना या गुन्ह्यांचे पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी पहाटे बालाजी ज्वेलर्स निलमनगर येथे चोरी केलेल्या टोळीतील राहूल रवींद्रसंग भोंड (रा. हडपसर, पुणे) व सुरज प्रकाश चव्हाण (रा. सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) हे पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी सुरज चव्हाण याच्याकडे घरफोडीच्या गुन्ह्याबद्दल कसन चौकशी केली असता त्याने चोरीतील अन्य दागिने प्रेम काशिनाथ कोळी याच्याकडे असल्याचे सांगितले. लागलीच फौजदार रजपूत यांनी सूत्र हलवली आणि त्यांनी प्रेम कोळी याला कलावती नगर, एमआयडीसी सोलापूर) येथून अटक केली.