राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक तथा कर्मयोगी रंगा हरी यांचे रविवारी सकाळी कोच्ची येथील अमृता रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. रंगा हरी यांचा जन्म 5 डिसेंबर 1930 रोजी त्रिपुनिथुरा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रंगा शिणॉय, तर आईचे नाव पद्मावती होते. त्यांना तीन भाऊ आणि चार बहिणी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट अल्बर्ट्स हायस्कूल येथे झाले. कोच्चीतील महाराजा कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली होती. रसायनशास्त्रात बी. एस्सी करण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, शिक्षणादरम्यान तुरुंगवास भोगून परतल्यावर ते बी. एस्सी. करू शकले नाहीत. नंतर त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि स्वतंत्रपणे संस्कृत शिकले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर डिसेंबर 1948 ते एप्रिल 1949 या कालावधीत रा. स्व. संघावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर रंगा हरी यांनी तुरुंगात सत्याग्रही म्हणून काम केले.
टी. डी. मंदिराच्या क्रिडांगणातून त्यांनी संघदर्शनाचा ध्वज घेऊन जगभ्रमंती केली. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे संघजीवन सुरू झाले होते. रा. स्व. संघाचा संदेश देण्यासाठी रंगा हरी यांनी पाच देशांमध्ये प्रवास केला. गोळवलकर गुरुजी, मधुकर दत्तात्रेय देवरस, प्रो. राजेंद्रसिंह, कुप्प. सी. सुदर्शन आणि डॉ. मोहन भागवत अशा पाच सरसंघचालकांसोबत त्यांनी काम केले.
रंगा हरी यांनी संस्कृत, कोंकणी, मल्याळम्, हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांतील 50 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. या व्यतिरिक्त त्यांचे गुजराती, बंगाली आणि असामी भाषेवरही प्रभुत्व होते. त्यांनी श्रीगुरुजींच्या ‘समग्र गुरुजी’ या संपूर्ण ग्रंथाचे संपादन आणि संकलन केले. जे 12 खंडांमध्ये प्रकाशित झाले. पृथ्वी सुक्त हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले होते.
प्रगल्भ विचारवंत, पितृतूल्य व्यक्तिमत्त्व हिरावले – सरसंघचालक
त्यांच्या निधनावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शोकसंदेश दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, रंगा हरीजींच्या निधनामुळे एक प्रगल्भ विचारवंत, व्यावहारिक कार्यकर्ता, सर्वांत जास्त प्रेमळ आणि प्रोत्साहन देणारे पितृतूल्य व्यक्तिमत्त्व हिरावले गेले. रंगा हरीजी अर्थपूर्णरीत्या जीवन जगले. शेवटच्या दिवसांत त्यांना शक्ती कमी होत असल्याची जाणीव होती. परंतु, त्यांनी वाचन, लेखन आणि त्यांना भेटायला आलेल्या स्वयंसेवकांना आनंदाने समुपदेशन करण्याचा उपक्रम सोडला नाही. बोलणे बंद झाल्यानंतरही ते पाहुण्यांचे ऐकत असत आणि चेहर्यावरील हावभावांद्वारे प्रतिसाद देत असत. मी वैयक्तिकरीत्या आणि रा. स्व. संघाच्या वतीने त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या दिवंगत आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना करतो.