सोलापूर लोकसभेची निवडणूक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जाणार आहे. लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळावी, असा ठराव शहर-जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत एकमताने करण्यात आला आहे. आता तो पक्षश्रेष्ठींना पाठविला जाणार आहे.
सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजीमंत्री बसवराज पाटील व समन्वयक माजीमंत्री रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे बैठक झाली. यावेळी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी बसवराज पाटील म्हणाले, ७० वर्षात काँग्रेसवर अनेक संकटे आली, पण सोलापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. आता काही कारणांमुळे या मतदारसंघात काँग्रेसचा दोनवेळा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतरची सर्वात वाईट परिस्थिती देशात असून आता काँग्रेसच जनतेसाठी पर्याय आहे. आमदार प्रणितींचे काम कौतुकास्पद असून पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केलेला ठराव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.