एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना येत्या रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबॅटिक संघ ‘एअर शो’ सादर करणार आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एअर शो
पंतप्रधानांची उपस्थिती आणि एअर शो या दोन्ही गोष्टी खूपच विशेष आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही देशाच्या हवाई दलाचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे या शोचे विशेष आकर्षण असणार आहे.
संरक्षण विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, सूर्यकिरण एरोबॅटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या अंतिम सामन्यापूर्वी सूर्यकिरणचा एरोबॅटिक संघ १० मिनिटे आपल्या अॅक्रोबॅटिक्सने स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. या पार्श्वभूमीवर एअर शोचा सराव शुक्रवार आणि शनिवारी होईल. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये सामान्यतः नऊ विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.
भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर अंतिम सामन्यात
रविवारी होणारा हा सामना खास बनवण्यासाठी बीसीसीआयने अनेक मोठ्या व्यवस्था करत आहे. भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने त्यांच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पुन्हा एका अंतिम फेरी गाठली आहे.
भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत
भारत विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा पोहोचला आहे. याआधी १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा सौरव गांगुली कर्णधार होता. २०११ मध्ये जेव्हा भारताने अंतिम फेरी गाठली. तेव्हा श्रीलंकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चॅम्पियन झाला.
भारतीय संघाकडून वाढल्या अपेक्षा
भारतीय चाहते १२ वर्षांपासून विश्वचषक विजेतेपदाची वाट पाहत आहेत. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून विजेतेपदासाठीच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.