रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीत अष्टमी येथील अद्ययावत रक्तपेढीसाठी १ कोटी ६८ लाखांचा निधी दिला असून यासह येथे व्यायाम शाळा ही लवकरात लवकर उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थोन अभियान जिल्ह्यास्तर अंतर्गत अष्टमी येथील श्री बापदेव मंदिराकडे जाणारा रस्ता व शेड विकसीत करणे या कामाचे लोकार्पण आज अष्टमी येथे झाले. यावेळी मंत्री अदिती तटकरे बोलत होत्या. या प्रसंगी खासदार सुनील तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, अप्पा देशमुख, अमित उकडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तटकरे म्हणाल्या, स्थानिक नागरिकांकडुन परीसर सुशोभीकरण करण्याची मागणी होती. ती पुर्ण होत असताना समाधानाचे वातावरण या परीसरात आज निर्माण झाले आहे. हा परिसर व ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या मंदिर सुशोभीकरण करण्याचे काम झाले आहे, असे सांगितले.
यावेळी बोलताना खा.सुनील तटकरे म्हणाले, रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीत अष्टमी येथे होत असलेली रक्तपेढी महाराष्ट्रातील अत्याधुनिक रक्तपेढी ठरणार आहे. तांत्रीक बाबींची पुर्ताता होऊन रक्तपेढी येत्या वर्षभरात सुरुवात होणार आहे. यासह मागील कालावधीत अष्टमीत ८ ते ८.३० कोटींची विकास कामे करण्यात आले आहेत. अष्टमीकरांचे ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या मंदिर रोह्याच्या वैभवात भर टाकणारे मंदिर आहे. रोहा रेल्वे स्थानकात दुर पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी आपण रेल्वे बोर्डा कडे प्रयत्न करणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.
मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तळा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
तळा तालुक्यातील मौजे सोनसडे येथील डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सोनसडे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. तळा तालुक्यातील मौजे बोरघर हवेली येथील डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बोरघर हवेली सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन आणि तळा तालुक्यातील मौजे खैराट येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.