शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी योग्य ते पुरावे सादर करा, अशी नोटीस विधानमंडळ सचिवांची शिंदे गट आणि ठाकरे गटांना पाठवली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे. त्या कार्यवाहीला वेग येताना दिसत आहे.
शिंदे आणि ठाकरे गटांना विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी नोटीस बजावली होती. शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत शिल्लक आहे.
अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहे. 25 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सर्व आमदारांना हे वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. पण आता या निमित्ताने कदाचित आजी-माजी मुख्यमंत्री समोरासमोर येण्याची दाट शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.