मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.