सहमतीनं ठेवलेले लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार होत नाही, असा महत्त्वाचा निकाल मुंबई हायकोर्टने नुकताच दिला आहे. काय आहे प्रकरण ?
दोन प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असल्यास, ते कलम ३७६ अंतर्गत बलात्कार ठरू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी हे निरीक्षण नोंदवले असून, फौजदारी याचिका निकाली काढली.
या प्रकरणातील आरोपी आणि पीडित पुण्यातील आहेत. या प्रकरणातील पीडित महिला आरोपीच्या देखरेखेखाली असलेल्या एका संस्थेत काम करीत होत्या. त्या वेळी आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखववून बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद होते. आरोपीने अॅड. हर्षल सुनील पाटील आणि अॅड. पीयूष तोष्णीवाल यांच्यामार्फत तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
आरोपीविरोधात बलात्कारासह मारहाण, धमकावण्याच्या कलमान्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी ३० एप्रिल २०२२ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा गुन्हा जानेवारी २०१९ ते तीन एप्रिल २०२२ या कालावधीत घडल्याचे तक्रारदार महिलेच्या जबाबावरून दिसून येते.
तक्रारदार महिलेने सहमतीने लैंगिक संबंध ठेवले आहेत. याबाबत महिलेच्या खुलाशाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात आरोपीने महिलेचे झालेले नुकसान भरून काढले आहे. त्यांचे संबंध सहमतीने होते. त्यामुळे संबंधित गुन्हा रद्द करण्यास कोणताही आक्षेप नाही, असे महिलेने म्हटले होते.
या गुन्ह्यात बलात्काराचे कलम लागू होत नसल्याने गुन्हा रद्द करण्याची मागणी बचाव पक्षाने केली. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘शंभू कारवार वि. उत्तर प्रदेश राज्य’ यात दिलेला न्यायनिवाडा ग्राह्य धरून ‘एफआयआर’ रद्द केली.