रा.बा. शिर्के प्रशाला रत्नागिरी अंतर्गत बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्प अंतर्गत मातृभूमी परिचय शिबिरास पाट हायस्कूलमध्ये कला विषयक उपक्रमाने सुरुवात करण्यात आली.
या गुरुकुल प्रकल्प अंतर्गत मुलांचे रत्नागिरी जिल्हा व जिल्हा बाहेर मातृभूमी परिचय या उद्देशाने दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते. पाट हायस्कूलमधील विविध उपक्रम पाहण्यासाठी ही मुले पाट हायस्कूलमध्ये निवासी राहून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना भेटी देतात व येथील कला जाणून घेतात. यावेळी संस्था कार्याध्यक्ष समाधान परब , संस्था सचिव सुधीर ठाकूर मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर कलाशिक्षक संदीप साळसकर सौ. करकरे मॅडम, गौरव पिळणकर आणि इतर शिक्षक उपस्थित होते.
सुरुवातीलाच कलादालनात कुमार पवन प्रभू, कुमार सुमन गोसावी यांच्या सुमधुर गाण्याने सुरुवात करण्यात आली. कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी कोलाज चित्र, निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र, संकल्पचित्र याविषयी माहिती दिली संगीतामधील आरोह अवरोह विविध राग आणि वाद्याविषयी माहिती करून दिली. कुमार राज कुंभार याने पानाफुलांच्या सुंदर रचना चित्रीत केल्या. कुटुंब संरक्षण, ऐतिहासिक सिंधुदुर्ग, कथाकथन, आरोग्य विषयक माहिती, क्षेत्रभेटी असे विविध उपक्रम पुढील तीन दिवसात आखण्यात आले आहेत.
संस्था सचिव सुधीर ठाकूर यांनी मातृभूमीची कल्पना मुलांना समजावून सांगितली. मुख्याध्यापक कोरे सरांनी जीवनात येणारे चढ-उतार आणि त्याचा सामना कसा करावा याविषयी चांगली माहिती दिली. सर्व मान्यवरांनी या निवासी शिबीराला शुभेच्छा दिल्या.